करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मल्लखांब स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे. क्रीडा व युवकसेवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कविटगाव येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या.
जिल्हास्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत जिल्हातील विविध शाळांनी तसेच महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील वयोगट मुलांमध्ये गोरक्ष लोंढे याने द्वितीय क्रमांक व मच्छिंद्र लोंढे तृतीय क्रमांक तर समाधान क्षीरसागर याने चौथा क्रमांक तर १७ वर्ष वयोगटामध्ये चौथा क्रमांक अनिकेत करे याने मिळवला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्यावरील चार विजयी खेळाडूंची पुणे विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक करमाळा तालुका क्रीडा समन्वयक, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे व सागर शिरस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.