करमाळा (सोलापूर) : सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या रेल्वे लाईनवरील डिकसळ- कोंढारचिंचोली पुलाच्या दुरुस्तीचे काम स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बारामती ऍग्रोने सुरु केले आहे. पाच महिन्यापूर्वी एका बाजूच्या बांधकामाचे काही दगड निखळले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा बोगदा पडला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली होती. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पावसाच्या पाण्याने हा बोगदा मोठा होऊन पुलाची आणखी हानी होऊ शकते. मात्र यापेक्षा जास्त पुलाचे नुकसान होऊ नये म्हणू बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पुढाकार घेत कारखान्याच्या मार्फत ढासळलेल्या बोगद्याचे बांधकाम सुरू केले असल्याचे समजत आहे. यावेळी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, कोंढारचिंचोलीचे सरपंच शरद भोसले उपस्थित होते.
करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे दोन कोटी ५० लाख निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच नवीन पुलाची निविदा प्रक्रिया झाल्यामुळे नवीन पुलाची उभारणी होईपर्यंत हा जुना पूल हलक्या स्वरूपाच्या वाहतुकीसाठी वापरता येणार आहे. या कामामुळे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांचे कौतुक होत आहे.