करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अकलूजमधून याची सूत्रे हलत आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली तर करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार शामल दिगंबरराव बागल यांचे सुपुत्र संचालक होऊ शकतात. त्यामुळे प्रथमच करमाळा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले तिन्ही गटाचे प्रमुख युवा नेते या बाजार समितीत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १६१ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांचे चिरंजीव युवा नेते दिग्विजय बागल व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांचे अर्ज आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अकलूज येथे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. करमाळा तालुक्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या या तिन्ही गटाच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. जगताप गटाचे प्रमुख माजी आमदार जयवंतराव जगताप, पाटील गटाचे प्रमुख माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यासह नवनाथ झोळ, अजित तळेकर, देवानंद बागल, कल्याण सरडे, भारत पाटील यावेळी उपस्थित होते.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्हावे म्हणून जगताप, बागल व पाटील या प्रमुख गटाच्या युवा नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तिन्ही प्रमुख गटाचे नेते यासाठी एकत्र आले आहेत. मात्र अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २६) मुदत आहे. त्यामुळे त्याच दिवशी अधिकृत घोषणा होणार आहे.
अकलूज येथे झालेल्या बैठकीत जगताप गटाला ११ जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही अर्ज असेल. त्याशिवाय शंभूराजे जगताप यांचाही अर्ज असेल अशी शक्यता आहे. इतर कोणाचे अर्ज असतील हे पहावे लागणार आहे. पाटील गटाला ग्रामपंचायतमधून दोन जागा दिल्या जाणार आहेत. त्यात पृथीवराज पाटील यांचा अर्ज असेल अशी शक्यता आहे. कारण दोन जागा कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यात पृथ्वीराज पाटील यांचा एक आणि दुसरा अर्ज कोणाचा असेल याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
बागल गटालाही या निवडणुकीत दोन जागा देण्याचे ठरले असल्याचे बोलले जात आहे. त्यात दिग्विजय बागल यांचा एक व इतर कोणाचा अर्ज असेल हे पहावे लागणार आहे. की आणखी काय वेगळा निर्णय घेतला जातो हे पहावे लागणार आहे. मात्र राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काल (गुरुवारी) अकलूज येथे जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार जगताप, माजी आमदार पाटील व बागल या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बागल व पाटील गटासाठी प्रत्येकी दोन- दोन ग्रामपंचायत मतदारसंघांतील जागा देण्याचा निर्णय झाला. उर्वरित सोसायटी मतदारसंघातील 11 जागा जगताप गटाला देण्याचा निर्णय झाला.