करमाळा (सोलापूर) : ‘माहेरवरून पैसे घेऊन ये’, असे म्हणत २९ वर्षाच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले संशयित हे कर्जत (जि. नगर) तालुक्यातील पाटेवाडी येथील आहेत. फिर्यादी विवाहिता ही सध्या माहेरी केडगाव (ता. करमाळा) येथे आहे. पती सुनील शांतीलाल राजगुरू व सासू मंगल शांतीलाल राजगुरू अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. पतीहा टेंम्पोचा ड्रायव्हर आहे.
विवाहित फिर्यादीने म्हटले आहे की, ‘साधारणपणे 2021 मध्ये पती सुनीलने कुरकुभ येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये मला ठेवले. तेथे आम्ही साधारण दीड वर्षापर्यंत राहिलो. दरम्यानच्या कालावधीत पतीचा त्याच्या मोबाईलमध्ये एका महिलेबरोबर फोटो पाहिला. तेव्हा त्या महिलेविषयी विचारणा केली असता त्याने वेळोवेळी या फोटोतील महिला माझी बायको आहे, आम्ही लग्न केले आहे, असे सांगितले. परंतु त्या महिलेचा नाव व पत्ता सांगत नव्हता. त्याच्या वापराचे कपडे देखील आमच्या घरामध्ये नव्हते. पती हा नेहमी मुक्काम घरी केल्यानंतर सकाळी उठून आंघोळीसाठी बाहेर जायचे बहुदा ते त्याच महिलेकडे जायचे. याबाबत विचारणा केली असता ते घालून- पाडून बोलत व मारहाण करत. याची तक्रार सासूकडेही केली.
सासूकडे तक्रार केल्यानंतर तेही घालून पाडून बोलत होते. काही दिवसांपासून पती व सासू यांनी टेम्पोचे हप्ते भरण्यासाठी आई- वडिलांकडून पैसे घेऊन ये नाहीतर घरात राहायचे नाही, असे म्हणून त्रास सुरू केला. तेव्हा त्यांनी काहीही ऐकून न घेता मी कायमचे माहेरी निघून जावे, म्हणून घरांमध्ये उपाशी ठेवणे काही एक ऐकून न घेता कायमचे माहेरी निघून जावे म्हणून वारंवार अपमानास्पद वागणूक देऊन शारीरिक व मानसिक छळ केला.