करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी बागल गटाने दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर थकीत ऊस बिलाचे बिल मिळण्याची शक्यता असून यावर्षी श्री मकाई सहकारी साखर कारखाना काही दिवसातच सुरू केला जाईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी आज (गुरुवारी) प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
अध्यक्ष भांडवलकर म्हणाले, श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिले देण्याबाबत येत्या काही दिवसातच तातडीने कार्यवाही होत आहे. सभासदांची ऊस बिले अदा केल्यानंतर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम निश्चितपणे सुरु केला जाईल. सध्या कारखान्यातील अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सभासदांनी आतापर्यंत जो विश्वास कारखान्यावर ठेवलेला आहे तोच विश्वास भविष्यातही कायम राहील. यावर्षीच्या हंगामातील ऊस बिले व तोडणी वाहतूकदारांची बिले साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली रोख स्वरूपात दिली जाणार आहेत. ऊस उत्पादक सभासदांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे भांडवलकर यांनी म्हटले आहे.