करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी आज (रविवारी) ८८ मतदान केंद्रावर काही ठिकाणची किरकोळ शाब्दीक बाचाबाची वगळता शांततेत ७९.७० टक्के मतदान झाले. यामध्ये भगतवाडी येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९७.१८ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी म्हणजे ४८. ६८ टक्के मतदान केत्तूर येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये झाले आहे.
करमाळा तालुक्यातील कावळवाडी, रामवाडी, भगतवाडी, जेऊर, चिखलठाण, राजुरी, केत्तूर, गौडरे, कंदर, केम, कोर्टी, वीट, निंभोरे, घोटी व रावगाव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ४९ हजार ९५० मतदार होते. त्यात २६ हजार ५७७ पुरुष व २३ हजार ३७३ महिला मतदार होते. त्यापैकी ३९ हजार ८०८ मतदारांनी मतदानाची हक्क बजावला. त्यात २१ हजार ५४५ पुरुष व या हजार २६३ महिला मतदार आहेत. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही मतदान प्रक्रिया झाली. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.