Karmala Taluka Grampanchayt election Discussions raged about the release of Jewer Chem Chikhalthan Ravgaon KandarKarmala Taluka Grampanchayt election Discussions raged about the release of Jewer Chem Chikhalthan Ravgaon Kandar

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणीमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या (सोमवार ) कोणाच्या बाजूने मतदारांनी कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. मात्र विधानसभा निवडवणुकीच्या दृष्टीने ही तशी नेत्यांसाठीही महत्वाची निवडणूक होती. माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊरमध्ये स्वतः थेट लक्ष घातले होते. केममध्ये मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत थेट लक्ष घातले नाही किंवा कोठे छोटी सभा देखील घेतली नव्हती. मराठा आरक्षणामुळे नेत्यांना गावबंदी होती. त्यामुळे कोर्टी, वीट, रावगाव, कंदर, चिखलठाण, निंभोरे अशा मोठ्या गावात नेत्यांना उघडपणे कार्यकर्त्यांकडे जाताही आले नाही. स्थानिक पातळीवर सोईनुसार निर्णय घेऊन शिंदे, पाटील, जगताप व बागल गटाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. यामध्ये नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी आज (रविवारी) ८८ मतदान केंद्रावर शांततेत ७९.७० टक्के मतदान झाले. कावळवाडी, रामवाडी, भगतवाडी, जेऊर, चिखलठाण, राजुरी, केत्तूर, गौडरे, कंदर, केम, कोर्टी, वीट, निंभोरे, घोटी व रावगाव या गावांसाठी हे मतदान झाले. या निवडणुकीत ४९ हजार ९५० मतदार होते. त्यात २६ हजार ५७७ पुरुष व २३ हजार ३७३ महिला मतदार होते. त्यापैकी ३९ हजार ८०८ मतदारांनी मतदानाची हक्क बजावला. त्यात २१ हजार ५४५ पुरुष व या हजार २६३ महिला मतदार आहेत. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही मतदान प्रक्रिया झाली. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

या गावात काय होणार?
जेऊर ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणुक तिरंगी झाली. यामध्ये पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील, नितीन खटके व बाळासाहेब करचे यांच्यात सामना झाला. येथे पाटील गटाचे पारडे जड असून किती मताधिक्य असेल हे पहावे लागेल अशी चर्चा आहे.

चिखलठाण येथे सरपंचपद हे महिला राखीव आहे. मात्र शिंदे गटाचे समर्थक चंद्रकात सरडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांच्या पॅनलविरुद्ध पाटील, बागल गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. शिंदे गटाचे राजेंद्र बरकुंड हे सरडे यांच्याविरुद्ध पाटील व बागल गटाबरोबर निवडणुकीत होते. येथे विकास गलांडे यांच्या पत्नी व चंद्रकांत सरडे यांच्या पत्नीमध्ये सामना झाला. येथे दोन्ही गटाने विजयाचा दावा केला आहे.

रावगावमध्ये जगताप व शिंदे गटाच्या पॅनलविरुद्ध बागल व पाटील गट एकत्र आला. येथे दादासाहेब जाधव यांच्याविरुद्ध शेळके यांच्यात सामना झाला. जाधव यांच्याकडे 15 वर्ष सत्ता आहे. मात्र ती सत्ता राखण्यात त्यांना यश येणार का? हे पहावे लागणार आहे. वीटमध्ये शिंदे गटाचे समर्थक राजेंद्रसिंह राजेभोसले व उदय ढेरे यांच्यात एकमत नव्हते. त्यामुळे शिंदे गटाचे दोन पॅनल झाले होते. तर पाटील गटाचा एक पॅनल होता. येथे तिरंगी लढत झाली आहे. चांदणे, गणगे व कांबळे यांच्यात हा सामना झाला. येथे बागल व जगताप गटाच्या भूमिकाही महत्वाच्या होत्या. ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी ही निवडणूक होती, असे येथील कार्यकर्ते सांगत आहेट. येथे कोण विजयी होणार हे पहावे लागणार आहे.

निंभोरे येथे शिंदे गटाचे समर्थक रविन्द्र वळेकर यांच्याविरुद्ध पाटील गट यांच्यात लढत झाली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यानी सोईनुसार निर्णय घेऊन सर्व कार्यकर्ते येथे एकमेकाच्या विरुद्ध होते. त्यामुळे येथे नेमका पॅनल कोणाचे हे सांगता येत नसल्याचे सांगितले जात आहे. केम येथे अजित तळेकर यांच्याविरुद्ध शिंदे, बागल व जगताप गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र त्यात काय होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. येथे पत्रकार धर्मराज दळवे हे विजयी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

कंदरमध्ये पत्रकार गणेश जगताप हे भास्कर भांगे यांच्या पॅनलमध्ये सरपंचपदासाठी रिंगणात होते. त्यांच्याविरूद्ध दोन उमेदवार होते. त्यामुळे हा निकाल महत्वाचा असून भांगेची सत्ता राहणार की जाणार हे पहावे लागणार आहे. ही निवडणूक भांगेंसाठी महत्वाची असणार आहे. कावळवडीत हाके हे सरपंच होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रामवाडी, भगतवाडी, राजुरी, केत्तूर, गौडरे, घोटीतील निवडणुकीत काय होणार हेही पहावे लागणार आहे. कोणत्याच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काय होणार हे स्पष्ट नाही. मात्र सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या आपणच विजयी होणार असल्याचे दावे केले जात आहे. त्यामुळे सर्वांचीच धक- धक वाढली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४