करमाळा (अशोक मुरूमकर) : मोहिते पाटील व निंबाळकर हे दोघे एकत्रच काम करत आहेत. जे चित्र दाखवले जात आहे, तसे वास्तवात काहीच नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे माढा लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांनी करमाळ्यात दिले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात समन्वय आहे. ते दोघे एकाच विचाराने काम करत आहेत. बाहेर ज्याप्रमाणे चित्र रंगवले जात आहे, तसे वास्तवात काही नाही. कालच आमची सर्वांची एकत्रित बैठक झाली, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्या बैठकीला आमदार राम सातपुतेही उपस्थित होते, असे सांगितले आहे.
पुण्यात पाणी प्रश्नाबाबत झालेल्या दोघांच्या वेगवेगळ्या बैठकीबाबतही त्यांनी खुलासा केला केला असून त्यांच्यात तसे काहीही नाही. खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावले होते. मात्र मोहिते पाटील हे काही कामानिमित्त येऊ शकले नव्हते. त्यानंतर त्याची बैठक झाली. मात्र पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून त्याच प्रश्नावर त्यांची बैठक झाली, असे शिंदे म्हणाले आहेत.