करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने काही ठिकाणी ‘ओपन जीम’ सुरु केल्या होत्या. मात्र या जीम सध्या गायब झाल्या आहेत. याकडे सध्या कोणाचेही लक्ष नाही.
लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने तीन वर्षांपूर्वी फंड गल्लीतील व्यापारी संकुलच्या समोर, मौलाली माळ, रंभापूरा आदी ठिकाणी व्यायामाचे साहित्य ठेवले होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र आता हे व्यायामाचे साहित्य गायब झाले असून पुन्हा अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकायला सुरुवात केली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
पत्रकार विशाल घोलप म्हणाले, ‘सदरच्या ओपन जीममधून साहित्य चोरून नेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळणी उपलब्ध होत नाही. साहित्य जागेवर नसल्याने या जागा खुल्या झाल्या आहेत. त्याठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून तेथे उकिरडे झाले आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून एका भागातून दुसऱ्या भागात साहित्य नेले जाते, अशा तक्रारी आहेत. तर आजपर्यंत जे साहित्य चोरीला गेले आहे. याची तक्रार पोलिसात केली आहे का? हा खरा प्रश्न असून याला जबाबदार कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. तर नेमके कोणत्या खुल्या जागेत किती रुपयांचे साहित्य व कोणत्या ठेकेदाराने साहित्य बसवले याचे फलक असतील तर नेमके कोणत्या ठिकाणावरून साहित्य चोरीला गेले याची माहिती नागरिकांना होईल. त्याबाबत नगरपालिकेला नागरिक माहिती देऊ शकतील. त्यामुळे कोणत्या प्रकारचे साहित्य लावले आहे याचा माहिती फलक ओपन जीमच्या परिसरात लावण्यात यावा.’
गणेश शहाणे म्हणाले, ‘करमाळा शहरात ओपन जीम हा पहिलाच प्रयोग झाला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या लाखो रुपयांची यात उधळपट्टी झाली आहे. साधारण दोन वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक आहेत. नागरिकांच्या तक्रारी कोणीही सोडवत नाही.’