सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे माहे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलजीवन मिशनच्या कामाच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पाटील, तसेच पाणीपुरवठा विभागाचे सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असून जलजीवन मिशन अंतर्गत ज्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे डिसेंबर 2023 पर्यंत तर सुरू असलेली कामे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावीत. संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. मजुरांची संख्या कमी असेल तर ठेकेदारांनी मजुरांच्या संख्येत वाढ करून दोन शिफ्ट मध्ये हे कामे पूर्ण करून घेण्याचे नियोजन करावे व कोणत्याही परिस्थितीत विहित वेळेत काम पूर्ण होईल यासाठी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे जे ठेकेदार विहित वेळेत पूर्ण करणार नाहीत त्या ठेकेदारांना नोटीसा देण्यात याव्यात. त्यावर सुनावण्या घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणीपुरवठा उप अभियंत्यांनी ठेकेदारांना कामे पूर्ण करण्याबाबत योग्य ती समज द्यावी. जे उप अभियंता गांभीर्यपूर्वक कामे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वादाने यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले की जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागात 855 पाणीपुरवठ्याच्या योजना जल जीवन मिशन अंतर्गत सुरू आहेत. यातील 165 योजनांची कामे 75 टक्के पेक्षा अधिक झालेली आहेत. 38 योजनेची कामे सुरू झालेली नाहीत तर 70 योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जल जीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेली सर्व कामे ही टंचाई सदृश असलेल्या गावांमध्येच सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्या गावांमधील टंचाईची परिस्थिती दूर होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.