सोलापूर : राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळच्या वतीने मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता अत्यल्प व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. याचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे. (Loan Scheme for Other Backward Class Persons)
इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता विविध कर्जपुरवठा योजना सरकारच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामध्ये विना व्याज असलेली 1 लाख रुपयेची थेट कर्जयोजना राबवली जाते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून मागासवर्गीय प्रवर्गातील कुशल व्यावसायिक व्यक्तींना व्यवसायाकरिता 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनेत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था अशा संस्थांना बँकेमार्फत उद्योग उभारणीकरिता कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत बँकेमार्फत लाभार्थीस व्यवसायासाठी 10 लाख पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते.
तसेच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत बँकेमार्फत विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रुपये इतके कर्ज वितरीत करण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बॅकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12 टक्के पर्यत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक तसेच सहकारी बँक तसेच सहकरी बँकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
इतर मागास प्रवर्गामधील गरजू व्यक्तींनी वरील कर्ज योजनांसाठी ऑनलाईन कर्ज अर्ज www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेस्थळावर दाखल करावेत.अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद मालूसरे यांनी केले आहे.