करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोळगाव येथील सुरज शिंदे यांची गुरुवारपासून (ता. १५) आयपीएलप्रमाणे सुरु होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत खेळी पाहता येणार आहे. या स्पर्धेसाठी सहा संघांची घोषणा करण्यात आली. असून त्यात ३०० खेळाडूंचा लिलाव झाला. त्यात शिंदेला पुणेरी बाप्पा संघाकडून सर्वाधिक बोली लावून घेण्यात आले आहे. शिंदे हा ऋतुराज गायकवाडच्या संघात खेळताना दिसणार आहे.
आयपीएलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र प्रीमियम लीग स्पर्धा होणार आहेत. १५ ते २९ जून दरम्यान पुणे येथे गहुंजे स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. एमपीएल क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे १०० अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेला मान्यता दिली आहे.
पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी दोन लाख ४० हजारची बोली लावली आहे. ही पुणेरी बाप्पा संघात सर्वाधिक आहे. सुरज हा करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मोठ्या कष्टाच्या जोरावर त्यांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे तर खडतर अशा कोरोना काळातही त्याने आपली फिटनेस गमावली नाही त्या कष्टाचे चीज झाले.