सोलापूर (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल देण्यासाठी बागल गट पूर्णपणे प्रयत्न करत आहे. बैठकीत आम्ही कोणतीही तारीख दिलेली नाही. मात्र लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत हा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया बागल गटाचे नेते कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
बागल म्हणाले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आणि सुरुवातीपासून आम्ही शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहोत. कारखाना कोणाचेही पैसे ठेवणार नाही. पैसे थकल्याने बागल गटाचे आणि शेतकऱ्याचे किती नुकसान होत आहे, त्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. मात्र त्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यावर आम्ही मार्ग काढत आहोत. आम्ही लवकरात लवकर पैसे कसे मिळतील हाच प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पैसे देण्यासाठी तारख देण्याचा विषय येतच नाही. पैसे देणे यावर आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांचा एक रुपयाही आम्ही ठेवणार नाही.
पुढे बोलताना बागल म्हणाले, शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी सुरुवातीपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. पैसे असूनही पैसे देत नाहीत अशी परिस्थिती नाही. मकाई कारखान्याकडून पैसे देण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत. पैसे मिळल्याबरोबर आम्ही पैसे देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.