करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या इच्छुकांचे मतदारसंघात दौरे सुरु आहेत. माढा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप, महायुतीकडून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे चर्चेत असून त्यांनी मतदारसंघात दौरेही सुरु केले आहेत. त्यातच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ‘तुमचे मिटत नसेल तर भाजपडकून मी लढतो’, असे म्हणत खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून त्यांना उमदेवारी मिळाली तर काय परिणाम होईल हे पहावे लागणार आहे.

‘भाजपला रोखण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरणार आहे. उमेदवारी मिळाली तर आनंदच आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार करणार असल्याचे’ महाविकास आघाडीचे अभयसिंग जगताप यांनी करमाळ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. ज्या दिवशी जगताप करमाळ्यात बोलले त्याच दिवशी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा दौरा केला. भाजपची उमेदवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर की मोहिते पाटील यांना मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही तुमचे (निंबाळकर व मोहिते पाटील) मिटत नसेल तर मी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवतो, असे म्हणत इच्छा व्यक्त केली आहे.

मोहिते पाटील यांनी माजी आमदार जगताप यांची करमाळा बाजार समिती येथे भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी ‘ही’ इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजप माजी आमदार जगताप यांना उमेदवारी देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. माजी आमदार जगताप गटाचे कार्यकर्तेही त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहेत. माजी आमदार जगताप यांची सध्या भाजपशी जवळीक आहे. त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला होता. शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघात रिंगणात होते तेव्हा भाजपचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांचे काम जगताप यांनी केले होते.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली तर करमाळ्यातील एकमेकांचे विरोधक पाटील व आमदार संजयमामा शिंदे, बागल गटही त्यांना मदत करू शकतो. त्याचे कारण जगताप व आमदार शिंदे हे सध्या करमाळ्यात एकत्र काम करत आहेत. त्याशिवाय मोहिते पाटील यांना मानणारे माजी आमदार नारायण पाटील हे देखील त्यांचे काम करू शकतात. बागल गट देखील गेल्या काही दिवसांपासूनचे तालुक्यातील राजकीय वातावरण पहाता बागल देखील त्यांना मदत करू शकतात. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या निवडणुकीवेळी बागल, पाटील व जगताप एकत्र आले होते. माजी आमदार जगताप यांच्याशिवाय दुसरी कोणाला उमेदवारी मिळाली तर उघडपणे कोण कसे कोणाचे काम करेल हे पहावे लागणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला हे चार व सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये माजी आमदार जगताप यांना उमेदवारी मिळाली तर करमाळा तालुक्यातील प्रमुख गट त्यांना विजयी करण्यासाठी मदत करू शकतील. माढा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे व जगताप यांचेही चांगले संबंध आहेत. माळशिरस मतदारसंघातील मोहिते पाटील हे जगतापांना सहकार्य करू शकतील. पंढरपूर तालुक्यातील काही गावे या मतदारसंघात येतात. त्या गावातील मतदार हे देखील माजी आमदार जगताप यांना सहकार्य करू शकतील. परिचारक यांना विधानपरिषदेत आमदार करण्यासाठी जगताप यांनी सहकार्य केले होते. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. सांगोला मतदारसंघातही शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे त्यांना मदत करू शकतात. माजी आमदार जगताप व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. एका कार्यक्रमात बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ‘शरद पवार यांना विरोध केल्याचा अजून मी परिणाम भोगत आहे’, असे म्हणत खंत व्यक्त केली होती. शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून उभे होते तेव्हा जगताप यांनी पवार यांचे काम केले असते आणि देशमुख यांना मदत केली नसती तर जगताप तेव्हा आमदार झाले असते असे बोलले जाते. मात्र आता त्यांना खरेच उमेदवारी दिली जाणार का? हे पहावे लागणार आहे. मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली तर त्यांच्या रूपाने करमाळ्याला पहिल्यांदा खासदारकी मिळेल असेही बोलले जाऊ लागले आहे. अर्थात लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तशा अनेक घडामोडी घडणार आहेत. आणि कोणाला उमेदवारी मिळणार आणि विजयी कोण होणार हे पहावे लागणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघाची २००८ मध्ये निर्मिती झाली. या मतदार संघातून २००९ मध्ये शरद पवार, २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील व २०१९ मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आहेत. २०२४ मध्ये कोण खासदार होणार हे पहावे लागणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *