गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या सामाजिक व राजकीय विषयात लक्ष घालत असलेले दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्वाचे वाटत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून उजनी धरण संघर्ष समिती करत आहे. त्यानंतर आता प्रा. झोळ यांनी देखील ही मागणी केली आहे. ही मागणी कराताना कालवा सल्लागार समितीत फक्त अधिकारीच असावेत, असे म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधींनाही लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात १० टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी प्रा. झोळ यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही पाठवली आहे. फडणवीस हे जलसंपदा मंत्री आहेत. प्रा. झोळ यांनी फडणवीस यांच्यासह संबंधित १४ प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे. जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस यांना हे पत्र दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणातून १० टीएमसी पाणी सोडायचा हा निर्णय कायदेशीर दृष्टट्या फक्त फडणवीस घेऊ शकतात का? हा प्रश्न यातून निर्माण केला जात असून मुख्यमंत्री शिंदे यांना हे निवेदन का दिले नसेल यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रा. झोळ हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहेत, असे दिसत आहे. मकाई ऊस बिलावरून सध्या चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे मंगेश चिवटे यांनाही ते मानतात असे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून जाणवते. मराठा समाजाला आरक्षणाशिवाय इतर काय सुविधा देता येऊ शकतात यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चिवटे यांच्या माध्यमातून सवांद झाला असल्याचे ते सांगतात, असे असताना आता उजनीच्या पाण्यासंदर्भात त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्यापेक्षा त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस महत्वाचे वाटू लागले आहेत का? असा प्रश्न त्यांच्या निवेदनावरून वाटू लागला आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री शिंदे यांचा कोठे उल्लेख नसल्याचे दिसत आहे. यावर प्रा. झोळ यांची काय प्रतिक्रिया येणार हे पहावे लागणार आहे.