करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील शालेय व्यवस्थापन समितीची दर दोन वर्षांनी समिती गठीत करणे गरजेचे असताना मुदत संपूनही समिती गठीत केली जात नसल्याने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी मुख्याध्यापकांच्या हस्तेच ध्वजारोहण करण्याची मागणी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
गायकवाड म्हणाल्या, ज्यांची मुले मराठी शाळेत शिकत आहेत त्यांनाच शालेय समितीमध्ये अध्यक्ष व सदस्य होण्याचा अधिकार असतो परंतु अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांची मुले ही प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत गेलेले असतानाही त्यांची पालक समितीवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती केली जात आहे. प्रशासन अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत मुख्याधिकारी बालाजी लोंढे व प्रशासन अधिकारी बनसोडे यांना त्यांनी निवेदन दिले.
शालेय व्यवस्थापन समिती ही राजकारणविरहीत असणे आवश्यक असताना ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वच ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक अशांनी आपली राजकीय शक्तीचा उपयोग करून स्वत: ची निवड समितीवर करून घेतलेली आहे. वास्तविक पाहता प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी मुख्याध्यापक यांनी ध्वजारोहण करणे गरजेचे असताना राजकीय हस्तक्षेपामुळे प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण हे बहुतांश राजकारण्याच्या हस्ते होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे वर्षभर शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कष्ट करणारे मुख्याध्यापक यांची मनधरणी करावी लागत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.