करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सुभाष चौकाचे नामांतर करण्याच्या मागणीला विरोध झाल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची व मागणी करणाऱ्या व विरोध करणाऱ्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक बोलावली होती. मात्र करमाळा पोलिस ठाणे येथे झालेल्या या बैठकीला नामांतर करण्याची मागणी करणारे भाजपचे पदाधिकारी गैरहजर होते. दरम्यान दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिली असून कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
करमाळा शहरातील सर्वात महत्वाचा म्हणून सुभाष चौकाची ओळख आहे. या चौकाचे नामांतर करून श्रीराम चौक असे करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली होती. मात्र सुभाष चौक हे नाव सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून असल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांच्या नेतृत्वाखाली समविचारी नागरिकांनी विरोध केला. हे नाव बदलू नये अशी मागणी त्यांनी केली होती.
या बैठकीवेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, बहुजन रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष देवा लोंडे, उपाध्यक्ष प्रविण ओहोळ, अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. शिवराज जगताप, सचिन काळे, सुनील भोसले, साईनाथ वाघमारे, ऍड. प्रा. गोवर्धन चवरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान आज (रविवारी) नियोजित धार्मिक कार्यक्रम असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.