करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायतच्या वतीने कोर्टी येथे विद्यार्थ्यांचे श्रमसंस्कार शिबीर सुरु झाले आहे. आज (सोमवार) या शिबीराचे उद्घाटन पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विलासराव घुमरे व प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड उपस्थित होते.
शिबीराच्या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, उपकार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, शिक्षण उपसंचालक पुणे राजेंद्र अहिरे, सहाय्यक शिक्षण संचालक ज्योती परिहार, राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रसाद कालगावकर, महाराष्ट्र गोवा राज्याचे समन्वयक अजय शिंदे, वित्त लेखाधिकारी दयानंद कोकरे, पुणे विभागीय समन्वयक पोपट सांभारे, नाम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक बाळासाहेब शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबीरात अरुण देशमुख हे ‘आधुनिक शेती, माती आणि पाण्याचे तंत्रज्ञान’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. फुलचंद नागटिळक ‘मी गाडगे महाराज बोलतोय…’ या विषयावर प्रबोधन करणार आहेत. आदर्श शेतकरी बाळासाहेब काळे यांचे ‘आधुनिक शेतीचे तंत्र ‘या विषयी माहिती देणार आहेत. प्रवचनकार ह.भ.प. डॉ.जयंत करंदीकर यांचे ‘अध्यात्माकडून विज्ञानाकडे वाटचाल ‘याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारुड सम्राट अनिल केंगार भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत. माजी प्राचार्य सुधीर इंगळे हे ‘स्मार्ट व्हिलेज संकल्पना’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक करमाळा विनोद घुगे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान सरपंच भाग्यश्री मेहेर यांनी केले आहे.