करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात रिक्षाचालकांना युनिफॉर्म घालणे व थांब्याच्या ठिकाणी लाईनमध्ये थांबणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय महाविद्यालय सुटण्याच्यावेळी विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून मेन रोडवर आस्थावेस्थ गाड्या थांबवणाऱ्यांना शिस्त लावण्यावर भर दिला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले आहे.
करमाळा पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक घुगे यांनी करमाळकरांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. करमाळा तहसील व पोलिस ठाणे परिसरात आस्थावेस्थ गाड्या लावणाऱ्यांना त्यांनी शिस्त लावली आहे. त्यामुळे सध्या या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. पोलिस ठाण्यासमोर कारवाई केलेली वाहने उभा केली होती. मात्र ती वाहने देखील त्यांनी हलवली आहेत. त्यामुळे परिसर स्वच्छ दिसत आहे.
आज (बुधवारी) पत्रकारांशी अनऔपचारिक गप्पा मारताना त्यांनी करमाळ्यात नागरिकांच्या सरंक्षणासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगतानाच शिस्तीबद्दलही सांगितले. शहरात असलेल्या सर्व रिक्षाचालकांना एकच युनिफॉर्म केला जाणार आहे. त्यामुळे रिक्षाचालक ओळखला जाईल, काही अनुचित प्रकार घडला तर ओळखणे सोपे जाईल. शिवाय रिक्षाचालकांनाही त्यांच्यात दुसरा कोण आला तर ओळखणे सोपे होणार आहे.
पुढे बोलताना पोलिस निरीक्षक घुगे म्हणाले बस स्टॅन्ड परिसरात रिक्षा जेथे थांबतात त्यांनी एका लाईनमध्ये थांबावे. त्यामुळे एकाच नंबर झाला की दुसरा तेथे येईल व त्यांनाही व्यवसायाला मदत होईल. सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही. महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालय सुटण्याच्यावेळी त्या मार्गाने विनाकारण फिरणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनाही त्यांच्या काही अडचणी असतील तर थेट सांगाव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे. करमाळा शहरात वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीनेही नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.