करमाळा (सोलापूर) : सीना नदीवरील संगोबा बंधाऱ्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची तक्रार करत कुकडी सीना संघर्ष समितीच्या वतीने पाटबंधारे विभागाला आज (शुक्रवारी) निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कामाबाबत माहिती विचारत उपस्थित शाखाधिकारी श्री. इंगळे यांना धारेवर धरण्यात आले. दरम्यान संपूर्ण काम चांगले केले जात असून कोणीही गैरसमज करून अफवा पसरवू नका. पावसाळ्यापूर्वी काम करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सीना नदीवरील पोटेगाव बंधारा नादुरुस्त असल्याने बिटरगाव श्री, बाळेवाडी, पोटेगाव, पोथरे व निलज या गवानांही संगोबा बंधाऱ्याचाच फायदा होतो आहे. त्यामुळे संगोबा बंधाऱ्याचे काम तत्काळ आणि चांगले होणे आवश्यक आहे. मात्र हे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. यावर शाखाधिकारी इंगळे यांनी स्पष्टीकरण देत हे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. चुकीचे काम सुरु होते ते त्वरित थांबवण्यात आले. शेतकऱ्यांचे हीत पाहून हे करण्यावर भर असल्याचे सांगितले.
कुकडी सीना संघर्ष समितीचे ऍड. शशिकांत नरुटे यांनी काम सुरु होताना अंदाजपत्रकाची मागणी केली होती. मात्र अजूनही अंदाजपत्रक दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार हे काम चुकीचे होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे ते म्हणाले आहेत. या बंधाऱ्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही चुकीचे काम होऊ देणार नाही. कामाची माहिती देणारा येथे त्वरित फलक लावावा. व कामाची गुणवत्ता तपासून चांगले काम करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
घरगावच्या सरपंच लक्ष्मी सरवदे, माजी सरपंच किरण पाटील, कुकडी सीना संघर्ष समितीचे पत्रकार अशोक मुरूमकर, संजय सरवदे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, शिवाजी बनकर, बाळेवाडीचे दिनेश नलवडे, शिवाजी नलवडे, गणेश नलवडे, पप्पू ढवळे, भगवान भुई, गहिनीनाथ गायकवाड, चांगदेव गायकवाड, संतोष लाड आदी उपस्थित होते.