करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत राष्ट्रीय सहकारी विकास निगम (National Cooperative Development Corporation) ‘एनसीडीसी’ने काढलेल्या नोटीसप्रकरणावर सध्या राजकारण सुरु झाले आहे. कायदेशीरबाबी पूर्ण करून ऋण वसूली न्यायाधिकरण (Debt Recovery Tribunals) ‘डीआरटी’च्या आदेशानुसार आदिनाथ कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर नेमका काय प्रकार झाला होता ‘हे’ सांगत बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर निशाणा साधला असून आदिनाथचे नुकसान करण्यास माजी आमदार नारायण पाटील हेच जबाबदार असल्याचे सांगत आहेत.
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनी ‘काय सांगता’शी बोलताना म्हटले आहे की, आदिनाथ कारखान्यात पवार यांनी कधीच राजकारण केले नाही. मात्र आदिनाथ बारामती ऍग्रोकडे गेला असता तर शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा झाला असता. त्याच भावनेतून हा कारखाना घेण्यासाठी बारामती ऍग्रो यामध्ये आले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही कारखाना भाडेतत्वावर घेत होतो. मात्र त्यात ऐनवेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर हा कारखाना व्यव्यस्थित सुरु झाला असता.
माजी आमदार पाटील हे जबाबदार कसे आहेत हे सांगताना गुळवे म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना ताब्यात घेताना मी स्वतः बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना बोललो होतो. कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांच्याशीही सुरुवातील त्याच दिवशी चर्चा झाली होती. सर्व चर्चा झाल्यांनंतरच आम्ही कारखानस्थळावर गेलो होतो. तेव्हा राजेंद्र बारकुंड व धुळाभाऊ कोकरे हे देखील होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक बागनवर यांनी कारखान्यावर येत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही कारखान्यावर सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गेलो. मात्र तेथे बागनवर आले नाहीत. त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद सांगत होता. दरम्यान माजी आमदार पाटील तेथे आले आणि त्यांनी कारखाना ताब्यात घेण्यास विरोध केला.तेव्हाच्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याही नागरिकांनी पहाव्यात,’ असे गुळवे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना गुळवे म्हणाले, बारामती ऍग्रोने कारखाना घेतल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष काहीच केले नाही, असा आरोप केला जातो. मात्र सरकार बदलल्यानंतर कारखाना ताब्यात आल्यानंतर मग पाटील, बागल व प्रशासकांनी कारखाना सुरळीत का केला नाही. आम्ही या कारखान्यात फक्त शेतकऱ्यांचे हीत पाहत आहोत, आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही हा कारखाना घेत होतो.