करमाळा : करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ मार्चला भारतविरुद्ध इराण असा भव्य कुस्तीचा आखाडा जीन मैदान करमाळा येथे दुपारी ३ वाजता होणार आहे, अशी माहिती करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सुनील सावंत यांनी दिली आहे.
सावंत म्हणाले, हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या कुस्ती मैदानामध्ये भारतासह इराणमधील नामवंत पैलवानांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नंबर एकची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफी विरुद्ध पैलवान हादी इराणी, नंबर दोनची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर व उपमहाराष्ट्र केसरी पै. गणेश जगताप विरुद्ध पै. माहदी इराणी तसेच नेपाळचा पै. देवा थापा, महाराष्ट्र चॅम्पियन पै. अनिल जाधव व पै. हितेश पाटील, पै. अमित लखा हरिद्वार तसेच अनेक नामवंत पैलवानाचे कुस्त्या होणार असून 51 रुपयेपासुन ते 5001रुपयेपर्यंतच्या कुस्ती सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत सावंत गल्ली येथील सावंत तालीम येथे नेमल्या जातील, यावेळी मैदानावर प्रेक्षणीय व चित्रथरार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पै. दादासाहेब इंदलकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन मालक गायकवाड, मनसेचे शहर प्रमुख नानासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते विनय महानवर पै. नागेश सूर्यवंशी (कसाब), पै. गणेश सावंत, पै. तुकाराम इंदलकर, पै. गणेश आडसुळ परिश्रम घेत आहेत.