करमाळा (अशोक मुरूमकर) : वीज बिल वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (एमएसईबी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणारी डोकेदुःखी लवकरच संपणार आहे. त्यामुळे वीजेची गळतीही थांबण्यास मदत होणार आहे. कारण करमाळ्यात स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. ते मीटर बसवल्यानंतर ग्राहकाला आधीच पैसे देऊन वीज युनिट खरेदी करावे लागणार आहेत. त्यामुळे पैसे संपले की वीज बंद होणार आहे.
मार्चंड आले की विजेची वसुली करणे हे अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर मोठे आव्हान असते. अनेकदा ग्राहक नको तेही बोलतात. मात्र आता ही कटकट बंद होणार आहे. करमाळा शहरात सर्व ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर जोडले जाणार आहेत. हा मीटर घेतल्यानंतर १०० रुपयांपासून पुढे पैसे भरून वीज घेता येणार आहे. १०० रुपयांची वीज संपल्यानंतर पुढील पैसे भरले नाही तर वीज मिळणार नाही. हे पैसे संपल्यानंतरही सायंकाळी ६ ते सकाळ यावेळेत व सुट्टीच्या दिवशी वीज सुरु राहणार असल्याची व्यवस्था यामध्ये आहे. मात्र पुढील पैसे भरताना जेव्हा वीज बंद पडली तेथून चार्ज सुरु होणार आहे, असे करमाळा शहरचे सहाय्यक अभियंत आर. बी. शिंदे यांनी सांगितले आहे. करमाळा ग्रामीण 1 चे कनिष्ठ अभियंता के. ए. वाघमारे यावेळी उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता आशिष कलावटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मीटर बसवण्याचे काम लवकरच सुरु होईल. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. करमाळा शहरात ८ हजार ५०० वीज ग्राहक आहेत. त्यांनाही जोडणी दिली जाणार आहे.