करमाळा (अशोक मुरूमकर) : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने मोहिते पाटील यांची घरवापसी झाली तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळणार आहे, असे विधान अभयसिंग जगताप यांनी केले आहे. करमाळ्यात त्यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी संवाद साधला. माढा लोकसभा मतदारसंघात मला उमेदवारी मिळाली नाही तरी शरद पवार यांच्यासाठी काम करत राहणार आहे. माझा दौरा हा फक्त उमेदवारी मिळावी म्हणून नाही तर शरद पवार यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे उपस्थित होते.
शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना अभयसिंग जगताप म्हणाले, पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली आहे. माझ्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यावरही चर्चा झाली आहे. मात्र पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्यासाठी माझे काम सुरु आहे. महादेव जानकर यांची व पवार यांची झालेली भेट यावर ते म्हणाले, जानकर यांनी पहिल्यांदा त्यांचे विचार स्पष्ट ठेवावेत. स्वार्थासाठी कोणीही निर्णय घेऊ नये.
पुढे बोलताना ते म्हणाले, जानकर हे महायुतीत आहेत. त्यांनी आपण महाविकास आघाडीबरोबर आहोत की महायुतीत आहोत हे त्यांनी स्पष्ट करावे. हि लढाई विचाराची आहे, असेही ते म्हणाले आहेत. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर सहा आमदार आहेत मात्र सामान्य मतदार हा त्यांच्याबरोबर नाही, असे दिसत आहे. सामान्य नागरिक हे आमच्याबरोबर आहेत, असेही ते म्हणाले आहेत.