मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर अजित पवार यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अजित पवार गटाकडून वांद्रे येथील एमआयटीत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे ३२ आमदार उपस्थित आहेत. यावर अजित पवार यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. अजित पवार यांना विधानसभेतील ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. यापैकी किती आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे नजरा लागल्या होत्या.
आज (बुधवार) सकाळपासून वांद्रे येथील एमईटीत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ठाण मांडून बसले होते. अजित पवार गटाकडून दावा केल्याप्रमाणे याठिकाणी ४२ आमदार उपस्थित राहण्याची शक्यता होती. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला कमी आमदार येणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एमईटीत आतापर्यंत राष्ट्रवादीचे ३२ आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भूजबळ, संग्राम जगताप, अदिती तटकरे, यशवंत माने, प्रफुल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे, सुनील शेळके, निलेश लंके, उमेश पाटील आदी यावेळी उपस्थित आहेत. (उपस्थित आमदारांची संख्या वाढू शकते. बैठक अजून सुरु आहे.)