करमाळा (सोलापूर) : उजनी बॅकवॉटर भागातील शेतीची वीज पुरवठा आठ तास ठेवावी व २९ गावाला पाणी पुरवठा करणारी जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत आपण जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले असून वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या गावात टँकरची आवश्यकता आहे, तेथे त्वरित टँकर सुरु करावेत, अशी सूचना प्रशासनाला दिली आहे. सीना नदीकटाच्या बिटरगाव श्री सह परिसरातील गावात दूषित पाणी असून तेथेही टँकर सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत प्रातांधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे याबाबत निवेदनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आमदार शिंदे म्हणाले, ‘जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून २९ गावांना पाणीपुरवठा होतो. तेथे टँकरला फिडर पॉइंटही देता येऊ शकतो परंतु ही योजना नादुरुस्त असल्यामुळे अडचणी येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरीकांमध्ये नाराजी असून येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचीही भावना नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी जेऊर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्त होणे अपेक्षित आहे. या योजनेवरून जेऊर, लव्हे, शेलगाव, वांगी नं.३, भाळवणी, पांगरे, कविटगाव, बिटरगाव, झरे, कुंभेज, जेऊरवाडी, खडकेवाडी, पोफळज, कोंढेज, निंभोरे, वरकटणे, सरपडोह, गुळसडी, शेलगाव (क), सौंदे, साडे, सालसे, घोटी, हिसरे, फिसरे, आळसुंदे, वरकुटे, नेरले व गौंडरेला पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, उजनीतील पाणी साठ्याचे नियोजन करताना बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा आठ तासावरून सहा तास करण्याचे धोरण प्रशासनाने जाहीर केले असून त्यानुसार अंमलबजावणी केलेली आहे. परंतु उजनीच्या पाण्यावर धरणग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
टँकरसाठी ग्रामपंचायतींनी तहसीलमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवावेत
एखाद्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणे या धोरणात सध्या बदल झाला असून दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव तहसीलमार्फत प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा. तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत.
- संजयमामा शिंदे, आमदार