अशोक मुरूमकर
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारातही आघाडी घेतली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज मोहिते पाटील यांनीही ‘आमचं ठरलंय’ म्हणत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन ‘तुतारी’ हाती घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. आणि त्यांचा प्रवेशही निश्चित मानला जात असून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे स्वतः भाजपमध्ये थांबून पक्ष आदेश पाळतील मात्र कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे या निवडणुकीतून माघार घेणार नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मोहिते पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची आहे. तर भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, माण व फलठण या विधानसभा मतदारसंघाचा मिळून माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार तालुके आहेत. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी जिल्ह्याचे राजकरण चालत होते. या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी न देता खासदार निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत झाली तर अतिशय चुरशीची निवडणूक होईल, असे चित्र सध्या या मतदार संघात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणुकीत उतरावे, अशी मागणी मोहिते पाटील समर्थकांची आहे. मात्र त्यांनी भाजपात बंडखोरी करत शरद प वार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे काय करतील व त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असून ही अडचण येऊ नये म्हणून आमदार मोहिते पाटील यांनी भाजपमध्येच थांबावे व धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव येथील एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. तर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे- खेवलकर या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. खडसे हेही भाजपमधील वरिष्ठ नेते होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजप सोडले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडले तेव्हा त्यांच्या सून रक्षा खडसे या मात्र भाजपातच थांबल्या होत्या. त्या भाजपचे काम करत आहेत. तर एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे या वडिलांबरोबर म्हणजे राष्ट्रवादीत काम करत आहेत. हाच पॅटर्न माढा लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपबरोबर तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी (शरद पवार) बरोबर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.