करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात अत्यवश्यक वस्तू अधिनियमसह फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाला असल्याने बागल गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.
याप्रकरणात आळजापूर येथील शेतकरी समाधानरणसिंग (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष बागल यांच्यासह तत्कालीन संचालक बाळासाहेब पांढरे, महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलवडे, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, रंजना कदम, उमा फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील, दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे व कारखाना यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसात कारखान्याने शेतकऱ्याला एफआरपी देणे आवश्यक असते. मात्र मकाई कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवले आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम ३ आणि जीवनावश्यक वस्तूसह इतर कलमाप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याने २०२२- २३ मधील उत्पादित केलेली साखर, बगॅस, मोलॅसिस आदी उत्पादित केले होते. मात्र गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपींनी त्याची परस्पर विल्हेवाट लावली, असल्याचा यामध्ये आरोप करण्यात आला होता.