करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यात आमदारकी व खासदारकीची चर्चा रंगली आहे. बागल गटाचा अस्मितेचा विषय असलेला मकाई सहकारी साखर कारखान्यात सुरुवातीपासून बागल गटाची सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्यात यावेळीही बागल गटाला यश आले. मात्र या निवडणुकीत बागल गटाच्या विरोधी गटाने शेवटपर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्याचा फायदा बागल गटाला झाला असल्याचे बोलले जात आहे.
मकाई साखर कारखान्यात बागल गटाचे जास्त सभासद आहेत. त्यामुळे येथे बागल गटाची सत्ता येईल, असे सुरुवातीपासूनच अंदाज होते. मात्र प्रा. रामदास झोळ यांनी बागल गटाच्या विरुद्ध पॅनल देण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी प्रमुख गटाच्या नेत्यांनाही संपर्क साधला होता, अशी माहिती आहे. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही हे निकालावरून स्पष्ट झालेले आहे.
या निवडणुकीत बागल गटाचे प्रमुख रश्मी बागल व दिग्विजय बागल हे स्वतः रिंगणात नव्हते. मात्र तरीही मतदारांनी स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या पॅनलला मतदान देत विजयी केले. बागल गटाच्या विरुद्ध या निवडणुकीत वातावरण निर्माण होईल, असे अंदाज निवडणुकीतील विरोधकांचा होता. मात्र प्रमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शेवटपर्यंत भूमिका जाहीर केली नाही.
अशी आहे चर्चा
मकाई कारखान्यात बागल गटाचे प्रमुख विरोधक असलेले शिंदे गट व पाटील गट यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. वामनराव बदे सोडले तर दुसरे कोणीही थेट विरोधात बोलत नव्हते. मकाईत सत्ता परिवर्तन होणे हे अशक्य आहे असे चित्र सुरुवातीलाच दिसले. मात्र पॅनल पूर्ण न झाल्याने निवडणुकीत चुरस नव्हती, अशा स्थितीत बागल गटाचा विनाकारण विरोध का घ्यायचा? अशी शक्यता प्रमुख गटाची असेल अशी चर्चा सुरु आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बागल बागल गटाची भुमीका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रमुख गटाने तटस्थ राहणे पसंद केले. त्याचा फायदा बागल गटाला झाला, अशी चर्चा आहे.