करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गेल्यावेळी तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराबद्दल नाराजी होती, पण तरीही आपल्याच माणसाला उमेदवारी द्यायची यातून भाजपने मोहिते पाटील यांना उमेदवारी न देता तिकीट वाटपात चुक केली’, असे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता भाजपवर टीकास्त्र सोडले.
कंदर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. २७) सभा झाली. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, शेखर माने, रवींद्र पाटील, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, देवानंद बागल, नवनाथ इंगळे, ऍड. शिवराज जगताप, काँग्रेसचे सुनील सावंत, डॉ. अमोल घाडगे, ऍड. सविता शिंदे, शहाजी देशमुख, राजाभाऊ कदम, सवितादेवी राजेभोसले आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘गेल्यावेळी तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराबद्दल या मतदारसंघात नाराजी होती. पण तरीही आपल्याच माणसाला उमेदवारी द्यायची म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न देता भाजपने तिकीट वाटपात चुक केली.’ पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘आम्ही बरेच दिवस मोहिते पाटील यांच्याबरोबर संपर्क साधत होतो. माजी उपमुख्यमंत्री विजयदादांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली नव्हती. आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकदा चौकशी करायला यायचो. या भागात खासदार निंबाळकर यांनी केलेल्या कामाबद्दल नागरीकातून बदल झाला पाहिजे अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी सुरु झाली होती. आम्हीही रासपाचे महादेव जानकरांना उमेदवारी द्या म्हणत होतो, आणि जनकरही उमेदवारीसाठी तयार झाले होते. मात्र त्यांना शेवटी काय झाले माहित नाही? ते तिकडे गेले आणि मग आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी फायनल केली. येथील प्रतिसाद पाहिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील, असा अंदाज आहे. याचा परिणाम फक्त माढाचा नाही तर सोलापूर, सांगली, सातारा, पुणे येथे होणार आहे. आम्ही माजी आमदार पाटील यांच्याशीही संपर्क साधत होतो, मात्र ते आम्हाला दाद देत नव्हते. मोहिते पाटील जेव्हा निर्णय घेतील तेव्हाच माजी आमदार पाटील निर्णय घेतील, असे आम्हाला वाटू लागले, आणि त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी होतील. पुढच्यावेळी आपले सरकार येणार आहे, अशीही आशा जयंत पाटील व्यक्त केली आहे.