करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात काल (मंगळवारी) सायंकाळी मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. करमाळा (सोलापूर) तालुक्यातील कुगाव ते इंदापूर (पुणे) तालुक्यातील कळशी दरम्यान वादळी वाऱ्यात एक प्रवासी बोट उलटली. यामध्ये सात प्रवासी होते त्यातील एकजण पोहत बाहेर आल्याने बचावला आहे. मात्र सहाजणांचा तपास सुरु असून ते बेपत्ता झाले आहेत. २४ तास झाल्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचा शोध सुरु आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा परिसरात दिवसभर आक्रोश सुरु होता. तर भीमा नदीच्या दोन्ही बाजूने परिसरातील शेकडो नागरिकांची गर्दी असून पाण्यात टक लावून शोध घेतला जात आहे.
मंगळवारी सांयकाळी घटना घडल्याचे समजलायपासून बेपत्ता व्यक्तींचे शोध कार्य सुरु आहे. मंगळवारी रात्री अंधारात तपास कार्यात अढथळा आला होता. त्यामुळे आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजता शोध कार्य सुरु झाले. करमाळा हद्दीतील बाजूला कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात आहे. तर कळशीच्या बाजूनेही शोध मोहीम सुरु आहे. एक पाणबुडी, तीन बोटी व २० जवान हे शोध घेत आहेत. त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छिमारांच्या व प्रवासी बोटी धावल्या आहेत. त्या माध्यमातून शेकडो नागरिक मदत कार्य करत आहेत.
शोध कार्य सुरु असताना बोट उलटली तेथे पाण्यात ऑइल तरंगत होते. त्यावरून तेथे बोट असल्याचे निष्पन्न झाले. बोटीचा लंगर लावूनही पाण्यात उलटलेल्या बोटीचा शोध सुरु होता. तेव्हा उलटलेली बोट सापडली. त्यानंतर त्या बोटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती बोट खडकात अडकली. त्यामुळे तिला बाहेर काढता आले नाही. दरम्यान त्या बोटीत पाणबुडीच्या साह्याने व्यक्तींचा शोध घेण्यात आला. मात्र शोध लागला नाही. सायंकाळी ४ वाजता पुन्हा वारे आल्याने शोध कार्य बंद करावे लागले.
या भागात दोन्ही बाजूने शोध कार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या पथकासह खाजगी तीन मोठ्या व छोट्या मच्छीमार करणाऱ्या ६ बोटीच्या मदतीने हे शोध कार्य सुरु आहे. पाणबुडीला पाण्यात उतरवून शोध घेतला जात असताना उलटलेल्या बोटीत असलेली मोटारसायकल सापडली आहे. या बोटीत सात व्यक्ती होत्या. त्यातील एकजण बाहेर आले होते. या बोटीत झरे येथील व कुगाव येथील व्यक्ती होत्या. कुगाव येथील व्यक्तींची मोटारायकल नव्हती. कुगाव येथील बोटीत गाडीचा चार्ज पडू नये म्हूणन गाडी नेहत नाहीत. गरजेचे असेल तरच गाडी नेहली जाते.
कुगाव येथील अनुराधा ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक) व गौरव धनंजय डोंगरे (वय २४) हे बेपत्ता आहेत. तर झरे येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता आहेत. सोलापूर येथे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बोट उलटल्यानंतर बाहेर आले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनस्थळी भेट दिली. तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे मदत कार्यासाठी तळ ठोकून आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर याची माहिती सर्वत्र पसरली. त्यामध्ये उशिरा आपले नातेवाईक असल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांकडून आक्रोश सुरु झाला. झरे येथील जाधव कुटुंबियांचे इंदापूर तालुक्यातील आघुती येथे नातेवाईक होते. कुगाव व आघोती येथे नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.
भीमेच्या काटावर गर्दी
शोध कार्य सुरु असताना भीमा नदीच्या दोन्ही बाजूला परिसरातील साधणार सातशे ते आठशे लोक उपस्थित होते. येथे रुग्णवाहिका व पोलिसांचा बंदोबस्त होता. आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीवही बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या घरीही आक्रोश पहायला मिळाला. येथे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, प्रा. रामदास झोळ, नानासाहेब लोकरे, चंद्रकांत सरडे, विकास गलांडे, राजेंद्र बारकुंड यांनी भेटी दिल्या.
वारे गोल फिरल्याने घटना घडल्याचा संशय
धनंजय डोंगरे हे कोल्हापूरला होते. त्यांच्या मुलाला चांगले पोहता येते. तो कायम पोहायचा. वारे असताना यापूर्वीही बोटी गेल्या आहेत. वारे आल्यानंतर बोट वाऱ्याच्या दिशेने घेतली जाते. हा नेहमीचाच प्रकार आहे. मात्र काल बोट उलटली तेव्हा वारा जोरात आला. त्यात वारे गोल फिरले आणि काही क्षणात पाण्याची लाट होऊन मागच्या बाजूने बोटीत पाणी घुसले. त्यामुळे हा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी झालेल्या घटना
उजनी धरण परिसरात भीमा नदीच्या पात्रात प्रवासी यांत्रिक बोट उलटलेली ही पहिलीच घटना आहे. मात्र यापूर्वी झरे येथीलच एका लग्नाला बोटीने वऱ्हाड निघाले होते. तेव्हा त्यांची बोट उलटली होती. मात्र त्यात जीवितहानी झाली नव्हती असे सांगितले जात आहे. तेव्हा नदीच्या काटावर सर्व वऱ्हाडी ट्रॅक्टरने आले होते. आणि पुढे लग्नला बोटीने गेले होते. मात्र संपुर्ण वऱ्हाडच उलटले होते. साधणार १९८९ ला ही घटना झाली होती. तेव्हा पाणी जास्त नव्हते, असे सांगितले जात आहे.
- दोन वर्षपूर्वी वांगी येथे फिरायला आलेले आणि बोट उलटली होती. त्यातही जीवितहानी झाली होती.
- अकलूज येथील डॉक्टर फिरायला आले होते तेव्हाही असाच प्रकार झाला होता. तेव्हा प्रसिद्ध डॉक्टर यांचा मृत्यू झाला होता.
- सोगावलाही एक साधी बोट उलटली होती, अशी चर्चा आहे.
उजनी परिसरात भीमा नदीतून करमाळा व इंदापूर तालुक्यात जाण्यासाठी या ठिकाणी आहेत बोटी
- केत्तूर ते चांडगाव
- ढोकरी ते शहा
- चिखलठाण ते पडसथळ
- कुगाव ते सिरसोडी
- कुगाव ते कळशी
- कुगाव ते कालठाण
- वाशिंबे ते गंगावळण
पुलाची अनेक दिवसांपासून मागणी
करमाळा व इंदापूरला जोडण्यासाठी फक्त भीमा नदी मध्ये आहे. उजनी जलाशय यामुळे या भागात सतत पाणी असते. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्यासाठी बोटीचा वापर केला जातो. जीव धोक्यात घालून हा प्रवास सुरु असतो. यावर मार्ग काढण्यासाठी येथे पुलाची मागणी आहे. आता कुगाव ते शिरसोडी पूल मंजूर आहे. मात्र या कामाची अजूनही प्रतीक्षा आहे. हा पूल झाला तर इंदापूर ते करमाळा भाग जोडला जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा
भीमा नदीच्या पात्रात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शोध कार्यात मदत मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाला योग्य त्या कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पूल लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु राहणार आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. येथील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेऊन असून मदतीत कोणतीच कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाला कळवले आहे.