करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात कुगाव ते कळशी दरम्यान वादळी वाऱ्याने बोट उलटून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कुगाव येथील एका व्यक्तीच्या वारसाच्या खात्यात आज (शुक्रवारी) सरकार नियमानुसार आर्थिक मदत जमा झाली आहे. इतर व्यक्तींच्या वारसांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
उजनी जलाशयात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी कुगाव येथून कळशीकडे जाणारी प्रवासी बोट उलटली होती. वादळी वाऱ्याने उलटल्या या बोटीत चालकासह सातजण होते. त्यातील एकजण पोहत बाहेर आला होता. त्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. दरम्यान अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक), आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे (वय २४, दोघे रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष, सर्व रा. झरे, ता करमाळा) यांचे मृतदेह सापडले होते. यातील मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, यशवंत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार ठोकडे या घटनास्थळी मदतीसाठी ठाण मांडून होत्या. पोलिसांनाही व वैद्यकीय अधिकारी व मच्छीमार यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीसाठी पुढे आले होते.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, कुगाव येथे झालेली घटना अत्यंत गंभीर व दुःखद आहे. सरकार नियमानुसार या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत केली जात आहे. कुगाव येथील डोंगरे यांच्या खात्यात आज मदत जमा झाली आहे. त्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण होती. येथील अवघडे यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. झरे येथील गोकुळ जाधव व त्यांच्या पत्नी यांची कागदपत्रे घेतली जात आहेत. या घटनेत मृत झालेल्या चिमुरड्याना मदत देण्याबाबत वरिष्ठांकडून सूचना मागवली आहे. या सूचना आल्याबरोबर मदत जमा केली जाईल. सरकारनियमानुसार चार लाखाची तत्काळ मदत दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी उजनीत प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घाला! बोट दुर्घटनेतील सहा मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी