करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले ओढे यांची साफ करावेत, अशी मागणी माजी नगरसेविका बानू जमादार यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
जमादार यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरात मान्सूनपूर्व ओढे नाले याची स्वच्छता करण्यात येते. परंतु आत्तापर्यंत नगरपालिकेने ओढे नाले साफ सफाई करण्यास सुरुवात केलेली नाही. सध्या अवकाळी पाऊस पडत असून शहरातील नाले ओढ्यामध्ये अत्यंत घाण झालेली असून काही ठिकाणी वेड्या बाबळीची झाडे मोठी झालेली दिसून येत आहेत
ओढ्यातही प्रचंड प्रमाणात घाण झालेली दिसून येत आहे, परंतु नगरपालिकेला अद्यापपर्यंत नालेसफाई बाबत कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे. 2008 पासून करमाळा शहरातील ओढ्या नाल्यात पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे नगरपालिकेने याबाबत सतर्क राहून त्वरित करमाळा शहरातील ओढे नालेची त्वरित साफसफाई करावी. नगरपालिकेने आपत्कालीन विभाग कार्यान्वित करावा व त्या ठिकाणी जबाबदार कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. शहरातील नागरिकांना आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्यासाठी करमाळा नगरपालिकेचा लँडलाईन त्वरित सुरु करणे आवश्यक आहे. कोणतीही हानी होऊ नये याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे.