सोलापूर : राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार 12 जून हा दिवस जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था व कारखाने मालक यांनी 14 वर्षाखालील बालकास तसेच धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेशी संबंधीत उद्योग मालकांनी बाल कामगारास कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी केले आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्ट्रिने जिल्हा कृति दलामार्फत जिल्ह्यात 30 जूनपर्यंत कारखान्यांना भेटी देणे, बालकामगार प्रथा विरोधीसह्यांची मोहीम राबविणे, पोस्टर चिकटविणे, जनजागृती करणे यासाठी दलाची स्थापना करण्यात आली असून दलामार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळून आल्यास त्यांची मुक्तता करावी व बालकामगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करावी त्याचबरोबर मालक अथवा चालक यांचेकडून आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकामगार काम करीत नाहीत व भविष्यातही काम करणार नाहीत, याबाबत हमीपत्र संबंधितांकडून घेण्यातबाबत सुचना दिल्या.
कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा असून अशा ठिकाणी बालकामागार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड यांनी कळविले आहे.