करमाळा (अशोक मुरूमकर) : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुकानिहाय व्यवस्था करावी, अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबत लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र घोडगे उपस्थित होते.
प्रा. झोळ यांनी म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. मराठा कुणबी जातीचे दाखले काढले जात आहेत. मात्र त्याची पडताळणी वेळेत होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. करमाळा तालुक्यातून सोलापूरला येण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. येथे आले तर अनेकदा अधिकारी उपस्थित नसतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात एजंट आहेत. ही एजंटगिरी बंद करून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले द्यावेत. तालुकानिहाय शिबिरे घेऊन दाखले मिळवून द्यावेत.
निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाल्या, जातीचे दाखले विद्यार्थ्यांना त्वरित मिळावेत यासाठी आम्ही तालुकानिहाय शिबीरे घेण्याबाबत बैठक घेत आहोत. त्यात जातपडताळणीबाबतही सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यावर आवश्यक ती काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामार्फत सूचना दिल्या जातील. झोळ यांनी जात पडताळणी समितीचे सचिन कवले यांचीही भेट घेतली आहे.