करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील एका बियाणे व खते विक्रीच्या दुकानातून मुदत संपलेले बियाणे (उडीद) विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समोर आल्याबरोबर तहसीलदार शिल्पा ठोकडे व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दुकानाची तपासणी केली आहे, असे बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून शेतकऱ्यांकडे असे बियाणे असेल तर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यात दुकानदाराकडून वैधता संपलेले बियाणे विक्री झाल्याचा प्रकार समोर आला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील एका दुकानात रावगाव येथील शेतकरी विठ्ठल भुजबळ व राजेंद्र ससाणे यांनी 6 एकर पेरणीसाठी 30 किलो उडीद घेतला. त्या बियाणांची मुदत संपली आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी ग्राहक पंचातीचे तालुकाध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे यांच्याकडे केली. त्यांनी तहसीलदार ठोकडे व तालुका कृषी अधिकारी वाकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित शेतकरी यांच्याकडील मुदत बाहय विक्री केलेले बियाणे ताब्यात घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे.