करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील कुगाव ते कळशी दरम्यान उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या वारसांनाही जास्त आर्थिक मदत द्या व नियमावली घालून येथील जल वाहतुक सुरु करा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
करमाळा तालुक्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यात एक बोट उलटली होती. त्यात कुगाव येथून कळाशी येथे सात प्रवासी जात होते. त्यातील कुगाव येथील दोघे व झरे येथील एकाच कुटुंबातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सरकार नियमानुसार त्यातील चौघांना मदत मिळाली होती. मात्र दोन चिमुकल्यांच्या वारसांना मदत देण्यास अडचण येत होती. त्यांनाही आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. आमदार शिंदे यांनी ही मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, उजनी धरणात दुर्दैवी घटना घडली होती. त्यातील मृत व्यक्तींच्या वारसांना भरीव मदत देण्याची गरज आहे. अशा घटना घटना घडल्यानंतर जास्त मदत देण्याची गरज आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमावली घालून वाहतूक सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली आहे.