करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. यानिमित्ताने काँग्रेसकडून करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीबाबाबत चाचपणी सुरु केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदे व जगताप यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. याचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. यावेळी खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

लोकसभेतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या शिंदेंनी पक्षवाढीसाठी आपल्यामुळ काँग्रेसच्या जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधनी सुरु केली आहे. शिंदेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या करमाळा मतदारसंघातून जयवंतराव जगताप यांना ताकद देत पुन्हा काँग्रेस बळकटीचे त्यांचे धोरण तर नाही ना? माजी आमदार जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिले होते. या निवडणुकीवेळी जगताप यांची शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती. यावेळी जगताप यांनी त्यांचा सत्कार करत सूचक संदेश दिला होता.

पक्षसंघटनेच्या माध्यमातून स्व. नामदेवराव जगताप यांची जिल्ह्यावर मजबूत पकड व कार्यकर्त्यांचे संघटीत जाळे होते. जयवंतराव जगताप हे १९९० ते १९९५ व २००४ ते २००९ आमदार होते. तीस वर्षे ते करमाळा बाजार समितीचे सभापती आहेत. राज्य बाजार समिती संघाचे संचालक, प्रदीर्घ काळ सोलापूर डिसीसी बँकेचे संचालक व उपाध्यक्ष, आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले आहे. करमाळा विधानसभेत जगतापांची भूमिका महत्वाची राहणार आहे. ‘जगताप व शिंदे यांचे जुने ऋणानुबंध व भावनिक नाते आहे. स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे पक्षीय पातळीवर काही वेळा वेगळे निर्णय घेतले गेले असले तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंधात फरक पडलेला नाही.’ असे सांगितले जात आहे.

काँग्रेसने नुकतेच २८८ विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्यासाठी जगताप यांच्यासारख्या सक्षम उमेदवारांची नावे पुढे करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा काँग्रेसच्या रणनितीचा देखील हा एक भाग असू शकतो, असे बोलले जात आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *