माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्का! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीत काय घडले?

सोलापूर : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) सोलापूर येथे झालेल्या बैठकीत करमाळ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाबाबत चर्चा झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मते जाणून घेतली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला माढा मतदारसंघाच्या इच्छुकांमध्ये संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे यांच्यासह चौघांनी इच्छा व्यक्त केली. यानंतर माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. करमाळा मतदारसंघातून इच्छुकांची मते जाणून घेतली. करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, आपण एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे सांगत नारायण पाटील हेच या मतदारसंघात योग्य उमेदवार वाटतात. पण आपणही इच्छुक आहे. त्यावर तुमच्याशी चर्चा करतो आता नारायण पाटील यांचे नाव आपण फायनल केले असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणताच कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *