करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित असलेला कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता केला जाणार असून सोमवारी (ता. २९) सकाळी १० वाजता चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सरपंच चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.
माजी सरपंच सरडे म्हणाले, कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून आम्ही आमदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम लांबले. अत्याधुनिक मशनिरीच्या माध्यमातून हे अतिशय उत्कृष्ट काम केले जाणार आहे. हा रस्ता झाल्यानंतर या भागातील नागरिकांची वाहतूक समस्या सुटणार आहे. या कामाच्या भूमीपूजनावेळी सर्वांनी उपस्थित रहावे.