करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (श्री) येथे सीना नदीतून बेकायदा वळू उपसा सुरु असून वाळू काढणाराला वेळोवेळी समज देऊनही सतत वाळू काढली जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी येत लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा गावात दोन गटात वाद होऊ शकतो. वाळू चोराला कायदाच धाक राहिलेला नसून अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी केली आहे.
बिटरगाव श्री येथे सीना नदीतून वाळू उपसा होऊ नये म्हणून तलाठी विवेक कसबे यांनी नदीला जाण्याचा रस्ता खोदून बंद केला आहे. हा रस्ता कोण खोदते आणि वाळू उपसा कोण करत आहे, संशयित वाळू माफियांचे नाव देण्यात आलेले आहे. मात्र तरीही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्याला कायद्याचा धाक राहिलेला नाही. गावात वाद नको म्हणून काही नागरिकांनी हजारो रुपये खर्च करून बाहेरून वाळू आणलेली आहे. मात्र गावातील वाळू चोर जादा पैसे घेऊन बेकायदा वाळू उपसत आहे, असे मुरूमकर यांनी सांगितले आहे.
वाळू उपशाची माहिती मिळाल्यानंतर तलाठी कसबे यांनी गावात येऊन पंचनामा केलेला आहे. यावेळी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकरहेही उपस्थित होते. वाळू उपसा करताना गावातील एका व्यक्तीने त्याला पाहिले आहे. त्याची सर्व माहिती प्रशासनाला देण्यात आलेली आहे. आता त्यावर कारवाई करा, आणि गावातील वाळू उपसा कायमचा बंद करा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोतवालाचा सहभाग असल्याचा आरोप
गावात बेकायदा वाळू उपसा सुरु असून यावर कारवाई का केली जात नाही. याच्या पाठीशी नेमके कोण आहे हा प्रश्न केला जात असून गावात कोतवाल देखील आहे. कोतवाल हा प्रशासनाचा भाग असून त्यामुळे त्याचा यामध्ये काय सहभाग आहे का? असा प्रश्न केला जात असून त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाने आवाज उठवणार
बिटरगाव श्री येथील बेकायदा वाळू उपसा बंद करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र त्यावर कारवाई का होत नाही. याबाबत तोंडी सांगूनही कारवाई होत नसेल तर आता कायदेशीर रित्या आवाज उठवणार असल्याचे, मुरूमकर यांनी सांगितले आहे.
कारवाई करणार : प्रभारी तहसीलदार जाधव
सीना नदीतून वाळू उपशाला परवानगी नाही. वाळू उपसा करणे हे बेकायदा आहे. वाळू काढणारावर कारवाई केली जाईल, असे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी सांगितले आहे.