करमाळा (सोलापूर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत करमाळा तालुक्यात सर्वाधिक अर्ज मंजूर झाले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट योजनेमुळे हे अर्ज मंजूर झाले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका व संगणक ऑफरेटर यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यलयांकडून सुरु केलेल्या मदत कक्षातही अनेक अर्ज ऑनलाईन करण्यात आले होते.
अर्ज दाखल व्हावेत व त्यानंतर त्रुटी राहू नयेत यासाठी करमाळा तहसीलमध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, महिला व बालविकास विभाग यांनी अचूक नियोजन केले. गावपातळीवर मेळावे घेणे, बैठका घेणे, ऑनलाइन केंद्र सुरु करून अर्ज भरायला मदत करणे, मोफत ऑफलाईन अर्जांचे वितरण करणे, तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये या कामासाठी मदत कक्ष सुरू करणे आदी कामे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही केली होती.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत महाराष्ट्रामध्ये करमाळा तालुका अव्वल ठरला असून या कामांमध्ये योगदान देणारे अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर यांचा सन्मान आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. करमाळा तालुक्यात ३४ हजार ३६२ अर्जापैकी ३० हजार ९९६ अर्ज मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थींना रक्षाबंधन निमित्त १९ ऑगस्टला पहिल्या २ महिन्यांचे म्हणजेच प्रत्येकी ३ हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत तर २ हजार ४१६ अर्ज फेर सादर करण्यात आलेले आहेत. त्रुटी पूर्ततेनंतर ते अर्जांना मंजुरी मिळू शकते.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने जास्तीजास्त बहिणींनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतींचे ऑपरेटर्स, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.