करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केमजवळ गोवंशाची वासरे घेऊन जाणारा एक पीकप कंदर येथील योद्धा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून अडवला. त्यानंतर संबंधित चालकाला चोप देऊन त्याला करमाळा पोलिसांच्या ताब्यात देऊन वासरांना गोशाळेत सोडण्यात आले आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कंदर येथून भरधाव वेगात केमच्या दिशेने एक पीकप चालला होता. त्याचा संशय आल्याने तरुणांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तसाच पुढे गेला. त्यानंतर त्याचा पाठलाग करून त्याला केमजवळ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. करमाळा येथे हा पीकप येताच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, वंदे मातरम शक्ती सेनेचे सुहास घोलप आदी उपस्थित होते. संशयित पिकअप चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर अग्रवाल यांनी स्वतः पिकअप चालवून वासरांना गोशाळेत सोडले.