करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाण्याच्या वतीने पोथरे नाका ते पोलिस ठाण्यादरम्यान वृक्ष दिंडी काढत वृक्ष लागवड करण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह पोलिस बांधव पोलिस पाटील व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पोलिस हवालदार अजर शेख व हावलदार बालाजी घोरपडे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन महिन्यापासून शेख व घोरपडे यांनी या वृक्ष लागवडीचे नियोजन केले. करमाळा पोलिस ठाण्याच्या आवारात व इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्या झाडाचे जतन करण्यासाठी नियोजन केले आहे. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात वृक्ष दिंडीचा समारोप झाला. यावेळी कुलकर्णी यांच्या हस्ते हवालदार शेख व घोरपडे यांचा विशेष सत्कार झाला. कुलकर्णी म्हणाले, ‘मुलांनो तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावून ते झाड जतन करा. लावलेले झाड फळाचे असले पाहिजे ते तुम्हाला नक्कीच एक आठवण म्हणून फळ देईल. पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष संदीप पाटील व सर्व पोलिस पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी व इतर शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.