करमाळा (सोलापूर) : नेर्ले मार्गे करमाळा- कुर्डुवाडी एसटी बस सुरु झाली आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली असून समाधान व्यक्त केले जात आहे.
नेर्ले हे साधारण पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. येथे दोन विद्यालय व डीसीसी बँक शाखा आहे. सीना कोळगाव प्रकल्प येथून जवळच आहे. नेर्लेवरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी जातात. आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात.
नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर- पुणे- मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे- जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे करमाळा- कुर्डूवाडी एसटी बस हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेर्ले येथून वरकुटे, बारलोणीमार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी मागणी नेर्ले ग्रामपंचायतचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी नेर्ले व गौंडरे ग्रामपंचायत ठरावसह केली होती.
नागरिकांच्या मागणीचा विचारकरून सोमवारी (ता. २६) बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेर्ले, गौंडरे, निमगाव, हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या बसने प्रवास करावा, असे आवाहन माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.