करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांकडून तयारी सुरु आहे. काही ठिकाणी तर उमेदवाऱ्याही जाहीर झाल्या आहेत. तर काही ठिकाणी इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच करमाळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चीत मानले जात आहे. सोलापुरात झालेल्या बैठकीत प्रदेशाध्येक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नलही दिला होता. त्यानंतर बार्शी येथील एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी त्यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला होता. मात्र आता त्यांनीच करमाळ्यात माध्यम प्रतिनिधींच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे संभ्रम झाला असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात काहीही राजकीय घडामोडी झाल्या तरी माजी आमदार नारायण पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्यात प्रमुख लढत होईल, असे मानले जात आहे. माजी आमदार पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. पाटील गटाला वातावरणही चांगले आहे. नुकतीच करमाळ्यात शिवस्वराज्य यात्रा झाली त्यात पाटील गटाने मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीकडून माजी आमदार पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी आमदार रोहित पवार यांच्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. करमाळ्यात (जेऊर) आमदार रोहित पवार यांना माध्यम प्रतिनिधीने आमदार रोहित पवार यांना ‘करमाळा विधानसभेचे उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील हे असतील का?’ असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार पवार म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघात मी उमेदवार असेल का? हे सांगण्याचा अधिकार मला नाही. मी येथे येऊन नाव सांगायचे तर अडचणी येतात. हे नाव जाहीर करण्याचा अधिकार पवार साहेब, जयंत पाटील साहेब व सुप्रियाताई हे सांगणार. पक्षाने त्यांना अधिकार दिलेले आहेत.’
आमदार पवार यांनी करमाळ्यात उमेदवारीचा चेंडू शरद पवार यांच्याकडे ढकलला असला तरी काही दिवसांपूर्वी बार्शी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी माजी आमदार पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला होता. शिवस्वराज्य यात्रेवेळी खासदार अमोल कोल्हे यांनीही उमेदवारीबाबत केलेले विधान चर्चेत आहे. त्यात पुन्हा आमदार रोहित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.