करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने (शिंदे गट) दावा केला आहे. २५ वर्षांपासून महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असून या विधानसभेला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही जागा लढवणार असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात असून गटा- तटाच्या भूलथापांना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
विधानसभेच्या तोंडावर करमाळा तालुक्यात ‘शिवसंपर्क अभियान’ राबविण्यात येणार असून दोन महिन्यात या मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेले काम पोहोचवणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले. करमाळा विधानसभा मतदारसंघात बागल गट भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत असून त्यांच्यकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात शिवसेनेने या जागेवर दावा केला असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’वर जयवंतराव जगताप व नारायण पाटील हे आमदार झाले होते. स्व. दिगंबरराव बागल मामा हे देखील शिवसेनेच्या पाठींब्याने आमदार झाले होते. गेल्या निवडणुकीत रश्मी बागल यांनीही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता त्या भाजपमध्ये आहेत. त्यांच्याकडून महायुतीतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शिवसेनेने या जागेवर दावा केला असून उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागणार आहे.