करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आदिनाथ व मकाई हे दोन जुने सहकारी साखर कारखाने! त्यानंतर राजुरीत गोविंदपूर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. हा एक गूळ कारखाना सुरु झाला. हा कारखाना सुरु झाला तेव्हा शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळेल व देणी वेळेत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र या कारखान्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न निर्माण केला जाऊ लागला आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांच्याशी संबंधित हा कारखाना असल्याचे बोलले जात आहे.
करमाळा तालुक्यात सध्या आदिनाथ, मकाई सह विहाळ येथील भैरवनाथ व कमलाई हे साखर कारखाने आहेत. याबरोबर ऊसपट्ट्यात बंद अवस्थेत असलेला राजुरी येथील गोविंदपूर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. हा एक गूळ कारखाना आहे. राजुरी ते वाशिंबे रस्त्याच्या बाजूला साधारण १९ एकरावर हा कारखाना आहे. या कारखान्याचे काय झाले हे प्रा. झोळ यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सविस्तरपणे सांगावे अशी अपेक्षा आहे.
प्रा. झोळ यांना करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांच्याकडून रणनीती आखली जात आहे. करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच मोठा गाजावाजा करून ‘नोकरी महोत्सव’ घेतला. पण त्यांच्याच जवळच्या व्यक्तीचा (सासरे लालासाहेब जगताप) कारखाना (गोंविंदपर्व) बंद आहे. त्यातील कामगारांचे काय झाले? त्यांच्या सर्व पगारी दिल्या का? हा प्रश्न केला जात आहे. हा कारखाना तोट्यात का गेला? कारखाना सुरु केला तेव्हा सर्व बाबींचा अभ्यास केला नव्हता का? कारखाना व्यवस्थित सुरु रहावा यासाठी तुम्ही योग्य नियोजन केले नव्हते का? हा कारखाना तुम्ही काही दिवस चालवला अशी चर्चा आहे ते खरे आहे का? हा कारखाना बंद रहाणे आणि लिक्विडेशनमध्ये निघणे ही तुमची नामुष्की नाही का? याची सर्व उत्तरे तुम्ही कधी नागरिकांना देणार आहेत का? याबाबत तुम्ही कधी जाहीरपणे सांगाल का? (या कारखान्याबाबतची आणखी माहिती पुढील भागात)