करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्पदंशावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा येथील डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील (वय ६५) यांचे आज (मंगळवार) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नगर येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर बुधवारी (ता. ४) सकाळी १० वाजता तरटगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. जाधव पाटील हे २५ वर्ष आदिनाथ कारखान्याचे संचालक होते. त्यात त्यांनी दोनवेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. गावातील विविध सेवा कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालकापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. संचालक झाल्यानंतर ते सोसायटीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते आदिनाथ कारखान्याचे संचालक झाले होते. मोहिते पाटील यांच्यामाध्यमातून त्यांनी राजकीय काम सुरु केले होते. त्यांचे करमाळा तालुक्यातील बागल, जगताप, पाटील व शिंदे गटाच्या प्रमुखांशी अतिशय चांगले संबंध होते. त्यांनी राजकरणविरहित सामाजिक काम देखील मोठे केले होते.
डॉ. जाधव पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर सायकलवर जाऊन ग्रामीण भागात सेवा दिली. त्यात सर्पदंशावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. त्यांचे वडील कै. बुवासाहेब जाधव पाटील हे महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते. डॉ. जाधव पाटील यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ संतोष पाटील (आदिनाथचे माजी अध्यक्ष), मुलगा डॉ. रोहन पाटील व उपसरपंच अभिजित पाटी, पुतण्या अजिंक्य जाधव पाटील, सून डॉ. शिवानी जाधव पाटील, भावजई असा परिवार आहे.