करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व कारखान्याचे प्रमुख लालासाहेब जगताप यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. (या पत्रकार परिषदेला ‘काय सांगता’ला निमंत्रण नव्हते.) मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून काय प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ हे भूमिका का मांडत नाहीत अशी चर्चा सुरु झाली आहे. जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेवरून ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे प्रश्न…
१) ‘गोविंदपर्व’बाबत ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने ‘पोलखोल’ सुरु केला आहे. पहिले वृत्त दिले त्यानंतर याबाबत शेतकरी बोलू लागले. त्यावर जगताप यांनी आज भूमिका मांडली मात्र ‘काय सांगता’ला याबाबत का निमंत्रित केले नव्हते. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी का स्पष्ट उत्तर दिले नाही. किती शेतकऱ्यांचे पैसे राहिले हे का सांगितले नाही. पुरेशी माहिती नसताना तुम्ही घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन फक्त सारवासारव का केली?
२) पत्रकार परिषदेत जगताप म्हणाले आतापर्यंत आमच्याकडे एकही शेतकरी थकीत पैसे मागायला आला नाही. पण थकीत पैशांसाठी यांच गोविंदपर्व कारखान्यावर सप्टेंबर २०२१ मध्ये मांजरगाव, उंदरगाव, वाशिंबे व राजुरी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. थकीत ऊसबिलासाठी व्यवस्थापनाला जाब विचारला होता. २०१८- १९ मध्ये शेतकऱ्यांना दोन हजार दर देण्याचे जाहीर केले होते. परंतु तुम्ही काही शेतकऱ्यांना १५०० ते काही शेतकऱ्यांना १००० रुपये टन याप्रमाणे पैसे दिले. राहिले पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आले पाहिजे का? त्याशिवाय तुम्ही देणी देणार नाहीत का?
३) गोविंदपर्व कारखाना अडचणीत का आला? याचे स्पष्टीकरण तुम्ही का दिले नाही? २०१०- ११ मध्ये स्थापन झालेला हा कारखाना अतिशय उत्कृष्ट होता. तेव्हा सेंद्रिय गुळ पावडरला एका कंपनीकडून चांगली मागणी होती. परंतु त्यानंतर व्यवस्थापनाच्या धोरणामुळे हा कारखाना आर्थिक अडचणीत आला, असा आरोप केला जात आहे. त्यावर तुम्ही काहीच बोलला नाहीत.
4) ‘शेतकऱ्यांनी आताच पैसे का मागायला सुरुवात केली?’ यावर मला शंका वाटते असे जगताप म्हणाले. मकाई, आदिनाथ, कमलाई व विहाळ येथील करखाण्याकडील थकीत ऊस बिलासाठी प्रा. झोळ यांनी आंदोलन उभारले होते. परंतु प्रा. झोळ यांनी कधीही गोविंदपर्वच्या देणी देण्याबाबत उल्लेख केला नाही. तेव्हा त्यांचा नेमका काय उद्देश होता? हे तुम्हा का स्पष्ट केले नाही.
5) ‘प्रा. झोळ यांचा आणि कारखान्याचा काहीही संबंध नाही. ते कधीही यांच्या कारखान्याचे संचालक नव्हते व नाहीत. त्यांच्याकडे काहीही याबाबत नाही, असे जगताप यांनी सांगितले. पण कारखाना स्थापन झाला तेव्हा जगताप यांनी बँकेत कर्ज मागणी प्रस्ताव सादर केला त्यात सोसायटीतील पंचकमेटीतील सभसदांची नावे असे म्हणत प्रा. झोळ यांचा उल्लेख आहे. चंद्रशेखर जगताप, ललासाहेब जगताप, तृप्ती जगताप, रामदास झोळ व राजेंद्र बादल यांचा यामध्ये उल्लेख आहे. याचा नेमका अर्थ काय? यावर जगताप स्पष्टीकरण देतील का? न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकरणात प्रा. झोळ यांचा संचालक म्हणून उल्लेख आहे. योग्यवेळी ‘काय सांगता’ सर्व पुरावे सादर करणार आहे. ‘काय सांगता’ने केलेल्या प्रश्नाची उत्तरे तुमच्याकडे नाहीत म्हणून तर तुम्ही पत्रकार परिषदेत काय सांगताला निमंत्रित करण्याचे टाळले ना?
6) प्रा. झोळ यांचा कारखान्याशी संबंध नव्हता तर शेतकऱ्यांना पैसे द्या असे का सांगत होते. कारखान्याला ऊस द्या, यंत्रणा द्या, असेही ते म्हणत होते, असे शेतकरी सांगत आहेत. मग त्यांच्यावर आरोप झाला की तुम्ही जबाबदारी झटकत आहात असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर तुम्ही सारवासारव करत आहात याचे खरे उत्तर कधी द्याल का? (क्रमशः)